Solapur Crime News | शेती वहिवाटण्याचा मनात राग, कोयत्याने वार करत शेतकऱ्याला संपवलं

Murder

सोलापूर : Solapur Crime News | शेती वहिवाटण्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कांतीलाल ज्ञानदेव माने (वय-५२) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रोजी माढा तालुक्यातील बुद्रूकवाडी येथे घडली. याबाबत मयताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिवा बुद्रूक (रा. बुद्रूकवाडी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा पोलिसात प्राप्त झालेल्या फिर्यादीनुसार , फिर्यादीचे पती कांतीलाल माने गावातील संदीप पाटील यांची शेती करीत होते. याचाच राग मनात धरून आरोपीने शुक्रवार (दि. २२) रोजी ६.३० वाजताच्या दरम्यान फिर्यादीचे पती कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता गळ्यावर, डोक्यात, कपाळावर कोयत्याने, काठीने मारहाण करून जीवे मारले.

या घटनेनंतर आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल व सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबीयांकडून आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी माढा पोलीस स्टेशन समोर ३ तास हून अधिक वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान संशयित आरोपीची पत्नी व इतर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून आंदोलन मागे घेत मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.