Solapur Crime News | पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर पिस्तूलातून गोळीबार; अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार; घटनेने गावात भीतीचे वातावरण

सोलापूर : Solapur Crime News | जुन्या वादातून दाम्पत्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ येथे घडला आहे. शिवाजी पुंडलिक जाधव (वय-४२) आणि त्यांच्या पत्नी सुरेखा शिवाजी जाधव (वय- ३८) या दाम्पत्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. या हल्ल्यात शिवाजी जाधव यांना एक गोळी लागली, तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्या आहेत.
सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दोघांनाही तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना मोहोळ तालुक्यातील रोपळे-येवती मार्गावर मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दशरथ केरू गायकवाड (वय- ४५, रा. रोपळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेने रोपळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशरथ गायकवाड याला जमिनीच्या वादातून मारहाण केली होती. या घटनेनंतर दशरथने जाधव कुटुंबीयांविरुद्ध कायमच राग धरला होता. या जुन्या वैमनस्यातूनच दशरथने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या रात्री दशरथने जाधव दाम्पत्याला रस्त्यावर एकटे पाहून अचानक गोळीबार केला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. “आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे,” असे कुलकर्णी यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, दशरथच्या मित्र-नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी छापे टाकले आहेत.