ST Bus Employee Salary | एसटीतील 87 हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार

ST Bus

मुंबई : – ST Bus Employee Salary | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार एप्रिल महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. महामंडळाकडे निधी नसल्याने निम्मा पगार कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत बँक खात्यात जमा होतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३५० ते ३६० कोटी रुपयांची आवश्यकता असते. मागील १० महिन्यांपासून एसटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा केला नव्हता. यासाठी ४० कोटी रुपये वळते केले होते. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे अर्धे वेतन खात्यात वर्ग केले आहे. निधीच्या कमतरतेमुळे शिकाऊ कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांचा पूर्ण पगार खात्यात महामंडळाने जमा केला. एसटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्या पगारापैकी अनुक्रमे ५६ टक्के आणि ५० टक्के रक्कम पगार म्हणून खात्यात जमा केली आहे, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, एसटीतील ८० टक्के कर्मचाऱ्यांवर विविध कर्ज असून, पगाराच्या अनियमिततेमुळे हप्त्यांवर परिणाम होतो. निम्या पगारात हप्ता, घरखर्च, शिक्षण खर्च कसा करायचा, असे प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहेत. ४० ते ४२ अंशांच्या तापमानात प्रवासी सेवा चालक-वाहकांकडून विनातक्रार देण्यात येते. यामुळे सरकारने प्राधान्याने महामंडळाला निधी उपलब्ध करावा.

एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच पगाराच्या ५६ टक्के पगार एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला. याला सरकार जबाबदार असून, पगाराची जबाबदारी पूर्ण केली नाही.

१५ एप्रिलला बैठक

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचना अपर मुख्य सचिवांना दिल्या आहेत. मार्च महिन्यातील पगारासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची १५ एप्रिलला सकाळी ११.३० वाजता बैठक आयोजित केली आहे.

You may have missed