ST Bus News | उन्हाळी सुट्टीत अधिक संख्येने धावणार ‘लालपरी’; एसटी महामंडळाकडून 764 फेऱ्यांचे नियोजन

मुंबई : ST Bus News | उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-एमएसआरटीसी) दरवर्षीप्रमाणे अधिक गाड्यांची वाहतूक करते. या हंगामातही जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 एप्रिल ते दिनांक 15 जूनपर्यंत एसटीमार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु, उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळात शालेय फेऱ्या रद्द करून, त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.
उन्हाळी हंगामात विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर 15 एप्रिल 2025 पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरू केल्या जाणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गावरील 764 जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली. या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन 521 नियतांद्वारे 2.50 लाख किमी चालविण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी…
उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर, तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपव्दारे तसेच, आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.