Sudhakar Pathare Death | महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा ! पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे (IPS) यांचे अपघाती निधन

मुंबई : Sudhakar Pathare Death | आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा बसला धडकून अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे.
कोण होते सुधाकर पठारे?
सुधाकर पठारे हे मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. एम.एस्सी. अॅग्री आणि एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध शासकीय पदांवर काम केले.
1995: जिल्हा विशेष लेखा परीक्षक
1996: विक्रीकर अधिकारी (वर्ग 1)
1998: पोलिस उपअधीक्षकपदाची निवड, त्यानंतर पोलिस सेवेतच कार्यरत
राज्यात विविध ठिकाणी बजावली सेवा
सुधाकर पठारे यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून सेवा दिली.
अप्पर पोलिस अधीक्षक: चंद्रपूर, वसई
पोलिस अधीक्षक: सीआयडी अमरावती
पोलिस उपायुक्त: मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर
त्यांनी संघटित गुन्हेगारीविरोधात कडक कारवाई (मोक्का, तडीपारी, एमपीडीए) केली तसेच पोलिस दलात अनेक उपक्रम राबवले.
महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा
सुधाकर पठारे यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी त्यांना कायम आठवले जाईल.