Sunetra Pawar And Narhari Zirwal | सुनेत्रा पवार यांची नरहरी झिरवळांवर नाराजी; पक्षप्रतिमेबाबत स्पष्ट इशारा
मुंबई : Sunetra Pawar And Narhari Zirwal | मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाच्या कामकाजावरून वातावरण चांगलेच तापल्याचे समोर आले आहे. या बैठकीत उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत पक्षाची प्रतिमा डागाळणार नाही, यासाठी कठोर खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचखोरी प्रकरण उघड झाल्यानंतर पक्षात नाराजीची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. बैठकीत प्रशासनातील घडामोडींमुळे सरकार आणि पक्ष दोघांचीही प्रतिमा धोक्यात येऊ नये, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची जबाबदारी घ्यावी, असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.
या प्रकरणामुळे पक्षावर अनावश्यक टीका होऊ लागल्याने नेतृत्वाने गंभीर भूमिका घेतल्याचेही बैठकीत दिसून आले. दरम्यान, झिरवळ यांनी चौकशीत धागेदोरे स्वतःपर्यंत पोहोचले तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्त आणि जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला असून येत्या काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
