Surendra Pathare Foundation | वडगावशेरी मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी आशेचा किरण; रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्समध्ये नोकरीची संधी
पुणे: Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व सह्याद्री बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला युवक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृहात शनिवार (ता. १४) रोजी भरवलेल्या मेळाव्यात टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेडच्या वतीने २७५ पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली.
मेळाव्यात वडगावशेरी मतदारसंघातील बारावी, आयटीआय, बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. तसेच डिप्लोमा उत्तीर्ण एकूण ३७६ तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना अंतर्गत पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹१७,१९५ विद्यावेतन (स्टायपेंड), कंपनीकडून मोफत जेवण व बस सुविधा तसेच एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे पात्र उमेदवारांना त्वरित कामावर रुजू होता, यावे यासाठी टाटा मोटर्सचे सय्यद यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले. सोमवार (ता. १६) पासून निवड झालेले उमेदवार रुजू होत आहेत.
मेळाव्याबद्दल बोलताना सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक सुरेंद्र पठारे म्हणाले, “पूर्व पुण्यातील तरुण-तरुणींना रोजगारासाठी दूर भटकावे लागू नये व टाटा मोटर्स समूहातील नोकरीची कंपनीत संधी मिळावी, हा या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. नोकरी क्षेत्र तसेच युवक वर्ग यांच्यामध्ये एक पूल निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून अशा उपक्रमांमधून अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील.”
पुणे महानगरपालिका शिक्षण समिती सदस्या व नगरसेविका ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, आज अनेक तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या संधी शोधत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर ते निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना त्वरित नोकरीची संधी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे तरुण-तरुणींना सक्षम करण्यासाठी सातत्याने काम केले जाईल.”
सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सातव यांनीही निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
“मेळाव्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. नोंदणीपासून मुलाखतीपर्यंत सर्व टप्पे व्यवस्थित पार पडल्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. तसेच, मुलाखतीनंतर त्वरित ऑफर लेटर मिळाल्याने निश्चितच आनंद होतोय. सध्या बेरोजगारीची समस्या वाढत असताना नोकरी मिळणे कठीण झाले होते; अशा परिस्थितीत या रोजगार मेळाव्यामुळे आमच्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला”, असे सहभागी उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनीही समाधान व्यक्त करत सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेचे आभार व्यक्त केले.
