Surendra Pathare | पुणे: BMW, मर्सिडीज, 1.75 किलो सोनं अन् तब्बल 271 कोटींची मालमत्ता; गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत

Surendra Pathare

पुणे: Surendra Pathare | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय जनता पक्षचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 271 कोटी 85 लाख 21 हजार 877 रुपये इतकी आहे.

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, पठारे कुटुंबाच्या मालमत्तेत स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा असून त्याचे मूल्य 217 कोटी 93 लाखांहून अधिक आहे. यामध्ये जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक वित्तीय संस्था व इतर देणी मिळून 46 कोटी 59 लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याचेही स्पष्ट झाले आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांचाही त्यांच्या मालमत्तेत समावेश आहे.

उच्चशिक्षित असलेले सुरेंद्र पठारे यांनी COEPमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. शिक्षणानंतर त्यांनी विविध व्यवसायांमध्ये यशस्वी वाटचाल करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ते पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे या देखील प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या उमेदवार आहेत.

सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव आहेत. अलीकडील विधानसभा निवडणुकीत बापू पठारे यांच्या विजयामागे सुरेंद्र पठारे यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा होती. भाजपमध्ये प्रवेशानंतर पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम अधिक भक्कम झाल्याचेही बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्याने सुरेंद्र पठारे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

You may have missed