Surendra Pathare | सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश का? राजकीय समीकरणं काय सांगतात? सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामागे खुद्द देवेंद्र फडणवीसच? पुण्यात चर्चा का रंगली?
पुणे : Surendra Pathare | वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पठारे कुटुंबीयांशी संबंधित राजकीय निर्णयांमुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच सुरेंद्र पठारे हे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्यामागची पार्श्वभूमी आणि राजकीय गणित समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पार्श्वभूमी
2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बापू पठारे हे भाजपमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने भाजपकडून उमेदवारी मिळू शकली नाही.
या राजकीय परिस्थितीत बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. विशेष बाब म्हणजे, भाजपचा राजीनामा देण्यापूर्वी पठारे पिता-पुत्रांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.
भाजपशी कायम असलेली जवळीक
विधानसभा निवडणुकीनंतरही पठारे कुटुंबीय आणि भाजप यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटले नव्हते. लोकसभा निवडणुकीदरम्यान बापू पठारे यांनी भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जोरदार प्रचार केला.विशेष म्हणजे, वडगाव शेरी परिसरातील त्यांच्या प्रभागातून भाजपला लक्षणीय मताधिक्य मिळवून देण्यात पठारे कुटुंबीयांचा मोठा वाटा होता. यामुळेच पठारे कुटुंबीयांची भाजपशी असलेली राजकीय जवळीक अधिक ठळकपणे समोर आली.
सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेश का?
आता सुरेंद्र पठारे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करत आपले जुने राजकीय नाते पुन्हा एकदा अधिक मजबूत करणार आहेत. पुण्याच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली आहे की, हा प्रवेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच होत आहे.
हा प्रवेश केवळ पक्षप्रवेशापुरता मर्यादित नसून, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून वडगाव शेरी परिसरात संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिला जात आहे.
भविष्यातील राजकीय गणित
सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे वडगाव शेरी मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता. याशिवाय कुटुंबीयांचा स्थानिक प्रभाव भाजपच्या कामी येण्याची अपेक्षा. निवडणुकांत स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव.अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं आहेत.
एकंदरीत, सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा अचानक घेतलेला निर्णय नसून, मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय समन्वयाचा आणि जवळिकीचा पुढचा टप्पा मानला जात आहे. आगामी काळात या प्रवेशाचे राजकीय पडसाद पुण्याच्या राजकारणात कितपत उमटतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
