Tahawwur Rana | 26/11 हल्ल्यातील सुत्रधार तहव्वूर राणाला 18 दिवसांची ‘एनआयए’ कोठडी

मुंबई : Tahawwur Rana | मुंबईतील २६/११ बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेल्या तहव्वूर राणाला १८ दिवसांची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कोठडी (NIA Custody) सुनावण्यात आली. दिल्लीच्या विशेष न्यायालयात तहव्वूर राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली. आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते. एनआयएच्या विशेष न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.
एनआयएने तहव्वूर राणाच्या २० दिवसांची कोठडी मागितली होती. अखेर तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी देण्यात आली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन एनआयएच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चंदेरजित सिंह यांनी तहाव्वुर राणाला १८ दिवसांची कोठडी सुनावली.
१७ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेच्या ताब्यातून गुरुवारी खासगी जेटने भारतात आणले. कट कारस्थानात कोण कोण सहभागी होते, याची माहिती एनआयए त्याच्याकडून मिळवणार आहे. दरम्यान, कसाबप्रमाणे तहव्वुरला फाशीच व्हावी, अशी भावना प्रत्येक भारतीयाची असेल.
एनआयएचे प्रमुख सदानंद दाते (NIA Chief Sadanand Date) यांच्यावर तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे २६/११ च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रूग्णालयावर हल्ल्याला तोंड दिले होते. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राण वाचवले. राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आम्हाला या गतिशीलतेचा अभिमान आहे. भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया अमेरिका परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅमी ब्रूस यांनी दिली.