Tipu Pathan Arrested | नोटा उधळण्याबरोबरच खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी सारखे गुन्हे असणारा कुख्यात गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण जेरबंद, काळेपडळ पोलिसांनी केली कारवाई

Tipu Pathan

पुणे : Tipu Pathan Arrested | जबरदस्तीने सय्यदनगर येथील महिलेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करुन २० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या कुख्यात गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण याने एका कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रतिबंधकात्मक कारवाई करुन त्याची १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी केली.

सय्यदनगर येथील एका ५० वर्षाच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी येऊन सांगितले की, मागील ३ वर्षांपासून रेकॉर्डवरील गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी त्याचे सोबत ७ ते ८ साथीदारांबरोबर घेऊन बेकायदेशीर जमाव करुन आपल्या सय्यदनगर येथील १२९० स्क्वेअर फुट मोकळया प्लॉटवर आले. ही जागा माझी असून ही जागा मी माझा भाऊ इजाज पठाण याच्या नावाने खरेदी केली आहे. या जागेवर बांधलेले पत्र्यांचे शेड काढून घ्या, नाहीतर जागा कशी खाली करुन ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहिती आहे, असे धमकी टिपू पठाण याने दिली. प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून त्यावर असलेले या महिलेचे नाव खोडून टिपू पठाण याने जागा पाहिजे असल्यास २० लाख रुपयांची मागणी केली. आमच्याबरोबर वाद घालून जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने टिपू पठाण वर कारवाई केली.

या गुन्ह्यात कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने काळेपडळ पोलीस त्याचा तपास करत होती. तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत शोध घेतल्यावर तो सय्यदनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सय्यदनगर रेल्वे मार्गाजवळ इजाज सत्तार पठाण (वय ३९, रा. सय्यदनगर, हडपसर) त्याला ताब्यात घेतले, न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे यांनी केली आहे.

You may have missed