Toll Tax Rule Change | 15 फेब्रुवारीपासून अपूर्ण एक्सप्रेसवेवर पूर्ण टोल नाही : वाहनचालकांना मोठा दिलासा
मुंबई : Toll Tax Rule Change | देशभरातील वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, केंद्र सरकारने टोल वसुलीच्या नियमांत बदल केला आहे. १५ फेब्रुवारी २०२६ पासून पूर्णपणे तयार नसलेल्या एक्सप्रेसवेवर आता प्रीमियम दराने टोल आकारला जाणार नाही. रस्ता अपूर्ण असताना जादा शुल्क आकारले जात असल्याबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय लागू करण्यात येत असून प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नवीन नियमांनुसार, एखादा एक्सप्रेसवे पूर्ण क्षमतेने सुरू नसेल किंवा काही भागच वाहतुकीसाठी खुला असेल, तर त्या मार्गासाठी राष्ट्रीय महामार्गाएवढाच टोल आकारला जाईल. म्हणजेच एक्सप्रेसवे म्हणून २५ टक्के अतिरिक्त प्रीमियम टोल घेण्याची पद्धत अशा परिस्थितीत लागू राहणार नाही. प्रत्यक्षात जेवढा मार्ग तयार आहे आणि वापरात आहे, तेवढ्याच अंतरासाठी शुल्क आकारले जाईल.
सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (निर्धारण व वसुली) नियमांमध्ये दुरुस्ती करून ही तरतूद केली आहे. हा सवलतीचा दर जास्तीत जास्त एक वर्ष किंवा संबंधित एक्सप्रेसवे पूर्णपणे सुरू होईपर्यंत लागू राहील. त्यानंतरच नियमित एक्सप्रेसवे दर लागू केले जातील.
या निर्णयामागील उद्देश म्हणजे अपूर्ण प्रकल्पांवरही पूर्ण टोल आकारण्याबाबत निर्माण झालेला असंतोष कमी करणे, पर्यायी जुन्या महामार्गांवरील वाहतूक ताण घटवणे आणि प्रवास अधिक परवडणारा करणे हा आहे. विशेषतः मालवाहतूक आणि रोजच्या प्रवासासाठी एक्सप्रेसवे वापरणाऱ्या वाहनचालकांना इंधन व वेळेची बचत होणार आहे.
