Traffic Safety Awareness Activities In Pune | शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतूक सुरक्षा जनजागृती उपक्रम
पुणे : Traffic Safety Awareness Activities In Pune | वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) पुणे शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षेचा संदेश देत वेगळ्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम असणार आहे.
सकाळी ९ ते ११ या वेळेत शहरातील निवडक चौकांमध्ये आठ ते दहा स्वच्छता सैनिक फलकांसह उभे राहून वाहतुकीचे नियमन करतील. सिग्नल सुरू असताना वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले जाईल.
हेल्मेट परिधान केलेले दुचाकीस्वार तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे वाहन थांबविणारे चालक अशा नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
३५० हून अधिक स्वच्छता सैनिकांचा सहभाग
पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव आणि आदर पूनावाला क्लीन सिटीचे सीओओ मल्हार करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
पुणे-नगर रोड, सोलापूर रोडसह शहरातील एकूण ३१ सिग्नलवर ३५० पेक्षा जास्त स्वच्छता सैनिक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन फारुक बांगी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण नवगुने यांनी केले आहे.
