Uddhav Thackeray On Kunal Kamra | कुणाल कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ” कुणाल कामराने सत्य मांडले. जे चोरी करतात ते गद्दारच” (Video)

मुंबई : Uddhav Thackeray On Kunal Kamra | प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कुणाल कामरा याने केलेली अप्रत्यक्ष टीका शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली आहे.
दरम्यान त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. “कुणाल कामराने काहीही चुकीचे केलेले नाही. कुणाल कामराने सत्य मांडले. जे चोरी करतात ते गद्दारच”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” त्याने सत्यात्मक गाणं केलं आहे. सत्य आहे त्या जनभावना त्याने मांडल्या आहेत. आम्ही आजही बोलतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की, काल कामराच्या इथे जी तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ती कदाचीस गद्दार सेनेच्या एशिंशि (एकनाथ शिंदे शिवसेना) गटाने केली असेल. मुळात जे राज्य चाललंय शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललंय की गद्दारांच्या आदर्शाने चाललंय आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे.”
ते पुढे म्हणाले, ” जे भेकड लोकं आहेत, त्यांना त्या गाण्यावरून त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी काल तोडफोड केली. या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोशारींनी अपमान केला होता तेव्हा कोशारींचा निषेध करण्याचे यांच्यात धाडस नाही. हे भेकड लोकं आहेत आणि गद्दारच आहेत. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं आहे असं माझं मत नाही. कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या आहेत”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.