Vadgaon Sheri Water Issue | पुणे: पुरेसे पाणी उपलब्ध असूनही टंचाईचे गौडबंगाल, वडगाव शेरीतील 50 हजार रहिवाशांना फटका?

Vadgaon Sheri

पुणे : Vadgaon Sheri Water Issue | सोमनाथ नगर परिसरात पाणीटंचाई असताना आता वडगाव शेरीतील साईनाथ नगर, वाढेश्वर नगर, मूनर्वर सोसायटी परिसरातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टाक्यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नळाला मात्र पाणी येत नसल्यामुळे पाणी नेमके जाते कुठे हे गौडबंगाल आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका परिसरातील सुमारे ५० हजार रहिवाशांना बसत आहे. सोमनाथ नगर धनलक्ष्मी सोसायटी परिसर आदि भागातील नागरिक गेले तीन दिवसांपासून पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागणीवर अद्याप पाणीपुरवठा विभागाला तोडगा काढता आलेला नाही.

अशातच वाढेश्वर नगर, सिद्धेश्वर कॉलनी, महादेव नगर, रघुवीर नगर, मूनर्ववर सोसायटी परिसर, सम्राट रिजन्सी, जेपी हाईट्स, साईनाथ नगर, गायत्री सदन आदी भागातही गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर माजी नगरसेवक संदीप जराड यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेऊन या संपूर्ण परिसरात जागोजागी भेटी देऊन पाणी टंचाई जाणून घेतली. पाण्याच्या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी कबूलही केले. मग पाणीटंचाई का, याचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांना देता आले नाही.

वडगाव शेरी येथील धनलक्ष्मी सोसायटीतील महिला गेले तीन दिवस पाण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. एकंदरीत वडगाव शेरी भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाची उदासीनता पाहता येथील पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. पाणीटंचाई बाबत माहिती घेण्यासाठी प्रभारी उप अभियंता अन्वर मुल्ला यांना सलग तीन दिवस संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कनिष्ठ अभियंता रामदास आढारी, पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप याना संपर्क केला. मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. यावरून प्रशासन पाणीटंचाई बाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.

” आमची सोसायटी गेली ४ महिने पाणी टंचाईचा सामना करीत आहे. मध्यरात्री कमी दाबाने तासभर पाणी येते. अस्वच्छ असल्याने पंधरा मिनिटं घाण पाणी सोडून द्यावे लागते. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकारी फक्त आश्वासन देतात. पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नाही”, अशी प्रतिक्रिया सम्राट रिजन्सी येथील रहिवासी योगेश मास्तोळी यांनी दिली आहे.

You may have missed