World Womens Day 2026 | महिलादिनी पीएमपीची स्वारगेटवरून 8 मार्गांवर विशेष पर्यटन बससेवा
पुणे : World Womens Day 2026 | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) नागरिकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू करणार आहे. रविवार, दि. ८ मार्च रोजी स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून आठ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर वातानुकूलित ई-बस सोडण्यात येणार आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देता यावी, या उद्देशाने पीएमपीने यापूर्वी १३ पर्यटन बसमार्ग सुरू केले आहेत. या बससेवेला पर्यटक आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांच्या बुकिंगनुसार बसेस सोडण्यात येतात.
महिला दिन आणि रविवारची सुट्टी यांचा योग साधत नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी या विशेष बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी स्वारगेट बसस्थानकावरून ८ वातानुकूलित ई-बस विविध पर्यटन मार्गांवर धावणार आहेत.
या पर्यटन बससेवेअंतर्गत प्रति व्यक्ती फक्त ५०० रुपये इतक्या परवडणाऱ्या तिकीट दरात पुणे परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांची दिवसभरात सफर करता येणार आहे.
कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच विशेषतः महिला प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेऊन रविवारची सुट्टी पर्यटनासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
या पर्यटन बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक आणि निगडी बसस्थानक येथील पास केंद्रांवर करता येणार आहे.
