Yogesh Tilekar News | समान पाणीपुरवठा व कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार; आमदार योगेश टिळेकर यांची माहिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद
पुणे : Yogesh Tilekar News | “शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून, आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील,” अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेशअण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते.
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी, ९ औचित्याचे मुद्दे आणि ७ विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली. कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले. पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर व अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरु असलेली शाळा या लक्षवेधीना मंत्रिमहोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २८० कोटींचा निधी आला, मात्र, त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही, याकडे लक्ष वेधले.”
“पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून, त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे. परिणामी मुलभुत सोईसुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. उपनगरांमधील नागरिक कर भारत असूनही त्यांना विकासकामांचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल. शहरात बकालपणा वाढतो आहे. व्यापाऱ्यांकडून, विकसकांकडून बांधकामे सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली आहे,” असे ते म्हणाले.
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाशेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकाला देता कामा नये. तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीरगडावरही स्मारक व्हावे, अशी भूमिका मांडली. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली. संत सावता माळी यांच्या अरण (सोलापूर) येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी मिळावेत व त्याला ‘अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.”
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लागणार
- २४ तास व समान पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणार
- निकृष्ट दर्जाच्या औषधांची खरेदी झाली, त्याची चौकशी प्राधिकरणामार्फत करावी
- कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अभ्यासिका इमारतीचे बांधकाम
- मुंबई-पुणे व पुणे-नाशिकला जोडणाऱ्या नवीन चार पदरी रस्त्याचे काम मार्गी लावावे
- अवैध मद्यविक्री, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांची वाढती संख्या
- कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेम्बरपर्यंत पूर्ण होणार
- अनधिकृत गुंठेवारी, प्लॉटिंगवर निर्बंध आणणार
- कात्रज उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार