Youth Congress Pune | युद्धाचा परिणाम पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर, रोजगारावर; गॅस तुटवड्यावर युवक काँग्रेस आक्रमक: जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Youth Congress Pune | Impact of war on Punekar's kitchen, employment; Youth Congress aggressive on gas shortage: Statement given to District Collector

पुणे : Youth Congress Pune |  मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता पुणेकरांच्या स्वयंपाकघर आणि रोजगारपर्यंत पोहोचू लागला असून शहरात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, नेहल देशमुख, अथर्व सोनार, शिवानी देशमुख, भूषण भंडारी आदी उपस्थित होते.
शहरातील अनेक भागांमध्ये घरगुती गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या तुटवड्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, विद्यार्थी वसतिगृह, केटरिंग व्यवसाय तसेच लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमांवरही होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे काही कुटुंबांनी गॅस उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे लग्न समारंभ पुढे ढकलण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.

तसेच पुणे परिसरातील पावडर कोटिंग युनिट्स, लघुउद्योग, उत्पादन प्रकल्प तसेच विविध औद्योगिक युनिट्स हे गॅसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे उद्योग क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बरेच कामगार परत त्यांच्या राज्यात जात आहे.

दरम्यान गॅस तुटवड्याच्या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा गंभीर मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एलपीजी गॅस तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जाहीर करावा, गॅस एजन्सींवर विशेष तपासणी मोहीम राबवून काळाबाजार व साठेबाजीवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिक आणि उद्योगांसाठी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

यावेळी अक्षय जैन म्हणाले की, “गॅस तुटवड्याचा परिणाम सामान्य नागरिक, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रावर होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करणे आणि काळाबाजार रोखणे अत्यंत आवश्यक आहे.”

You may have missed