Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक येथील आई माता मंदिर ते एमटीएम मार्केट दरम्यानचा रस्त्याचा तीव्र उतार कमी होणार ! कामाच्या एस्टीमेटला मान्यता
पुणे : Gangadham Chowk Pune News | कात्रज कोंढवा रस्त्याकडून (Katraj Kondhwa Road) मार्केटयार्ड (Market Yard Pune) येथील गंगाधाम चौकाकडे जाणाऱ्या आई मंदिर येथील रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यासाठी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) पथ विभागाने रस्त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाचशे मीटर च्या या कामासाठीच्या एस्टीमेटला मंजुरी देण्यात आली आहे. तीव्र उतारामुळे या रस्त्यावर सातत्याने प्राणांतिक अपघात होत असल्याने प्रशासनाने या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudha Pavaskar) यांनी दिली.
गंगाधाम चौकाजवळील तीव्र उतारावरील रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत भीषण मृत्यू झाला. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असून जायबंदी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दक्षिण भागात लोकवस्ती मोठयाप्रमाणावर वाढत असल्याने पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीसांनी या मार्गावर दिवसा जड वाहतुकीला बंदी घातली आहे. तर महापालिका प्रशासनाने टेकडीवरून येणाऱ्या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने आई माता मंदिर ते एमटीएम मार्केट दरम्यानचा हा रस्ता असेल. या रस्त्याला अन्य नऊ रस्ते येऊन मिळतात. उतार कमी करण्यासाठी नेहमीप्रमाणे दोन थरांचा ( डीबीएम, डीसी) डांबरी रस्ता करण्याऐवजी खालील खडीच्या एका थरावर डांबरी व सिमेंटचा पातळ थर देण्यात येईल. यामुळे आता असलेला उतार बऱ्याच अंशी कमी होईल. या तंत्रज्ञानासाठी नेहमीच्या तुलनेत खर्च अधिक असला तरी रस्ता रस्ता टिकतोही अधिक काळ. पुणे महापालिका प्रथमच या पद्धतीचा वापर करत असून यासाठीच्या एस्टीमेंटला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा