Two Pune Crime Branch Constables Suspended | पुणे : अवैध धंदेवाल्यांशी संपर्क ठेवणारे गुन्हे शाखेचे 2 पोलीस हवालदार तडकाफडकी निलंबित, पोलिस दलात खळबळ
पुणे : Two Pune Crime Branch Constables Suspended | मटका जुगार चालविणार्यांशी संपर्क ठेवणार्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील दोन पोलीस हवालदारांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई (Shubham Jaywant Desai) व अभिनव बापुराव लडकत (Abhinav Bapurao Ladkat) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
समर्थ पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी जुगार घेणार्या औदुंबर अर्जुन सोनावणे (वय ६५, रा. नागेश्वर मंदिराजवळ, सोमवार पेठ) याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान औंदुबर सोनावणे याने आणि बाळा ऊर्फ प्रविण राजेंद्र चव्हाण (रा. सोमवार पेठ) याच्यासाठी मटका जुगार घेत असल्याचे सांगितले होते. बाळा चव्हाण याच्यावर कारवाई करुन ११ नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या समोर हजर केले. त्यावेळी आरोपीकडील मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली असता त्यात या पोलीस हवालदारांचा त्याच्याशी संपर्क असल्याचे दिसून आले आहे.
अधिक पडताळणी करीत असताना हवालदार शुभम देसाई हे आरोपीच्या मोबाईलवर कॉल करत होते. या कॉलवर ते आरोपीबरोबर संशयास्पदरित्या संपर्कात होता. त्यावरुन आरोपीशी व तो चालवित असलेल्या अवैध धंद्याशी संबंध असल्याचे दाट शक्यता आहे. यापूर्वी त्यांना वारंवार या संदर्भात तोंडी सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच गुन्हेगारी टोळीशी संबंध न ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. तथापी त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे शुभम देसाई व अभिनव लडकत यांनी कर्तव्यावर बेजबाबदार, बेफिकीर व जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन व नैतिक अध:पतनाचे गैरवर्तन व पोलीस दलाच्या हितसंबंधास अपाय करणारे वर्तन केल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोघांना निलंबित केले आहे.
