Pune ACB Trap Case | दीड लाखाची लाच मागून 1 लाखाची लाच घेणार्या महिला मंडल अधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | माती वाहतूकीचा परवाना घेतला असतानाही दीड लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांची लाच घेताना भोर मंडल अधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
रुपाली अरुण गायकवाड Rupali Arun Gaikwad (वय ४०, रा. संघवी लक्ष्मी विलास, वेताळ पेठ, भोर) असे या मंडळ अधिकार्याचे नाव आहे. त्या भोर तालुक्यातील निगुडघर मंडळ येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार यांनी भोर तहसीलदार यांच्याकडून १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंतच्या कालावधीकरीता २०० ब्रास माती वाहतूकीचा परवाना घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १ लाख २६ हजार २३० रुपयांची रॉयल्टीच्या स्वरुपात भोर तहसील कार्यालयात भरले आहेत. तक्रारदार हे ज्या भागातून माती उचलत आहेत, त्या मंडळाच्या मंडळ अधिकारी रुपाली गायकवाड आहेत. गायकवाड यांनी ३० नोव्हेंबर रोजी परवान्यामध्ये नमूद असलेल्या गाड्यांमधून माती वाहतूक करीत असताना त्या गाड्या अडवून इथून पुढे मातीच्या गाड्या चालू ठेवण्याकरीता व तक्रारदार करीत असलेल्या माती वाहतूकीच्या व्यवसायास सहकार्य करण्याकरीता त्यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत माती वाहतूक बंद ठेवायची अशी धमकी देऊन पकडलेल्या गाड्या सोडून दिल्या. त्यानंतर रुपाली गायकवाड या तक्रारदारास वारंवार त्यांच्या कार्यालयात भेटण्याकरीता बोलवत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी ३ डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने ४ डिसेंबर रोजी लाच मागणी पडताळणी केली. रुपाली गायकवाड यांनी तक्रारदारास भोर शहराच्या बाहेर अभिजित मंगल कार्यालय येथे बोलावून तक्रारदार कायदेशिररित्या माती वाहतूक करत असलेल्या व्यवसायाला यापुढे सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर भोरमधील भोरेश्वर नगर रोड येथील अभिजित मंगल कार्यालयाचे जवळ ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करीत आहेत.
