Local Body Elections Maharashtra | निवडणूक आयोगाच्या मतदार याद्याच सदोष; सर्वच महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे गार्हाणे मांडले
पुणे : Local Body Elections Maharashtra | निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहे. लोकसंख्येच्या तुलनेत छोट्या असलेल्या शहरांमध्ये हा घोळ मोठ्याप्रमाणावर आहे. यामध्येही दुबार मतदारांची संख्या ही खूप अधिक असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांनी निवडणूक आयोगासोबत आज ऑनलाईन बैठकीमध्ये केल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील महापालिका आयुक्तांची आज ऑनलाईन बैठक घेतली. मतदार याद्यांमध्ये आलेल्या त्रुटींबाबत आणि हरकतींबाबत सर्व आयुक्तांकडून जाणून घेतले. यामध्ये अगदी दहा लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांबाबत मोठ्या प्रमाणात हरकती आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी याद्यांमध्ये मतदारांचे पत्ते नसल्याने गोंधळ झाला आहे. तर काही ठिकाणी दुबार नावे मोठ्याप्रमाणावर आढळून आली आहेत. काहींची नावे परस्पर मतदार यादीतून अगदी दुसर्या जिल्ह्यातील अथवा मतदारसंघातील याद्यांमध्ये गेली आहेत. या त्रुटी दूर करण्याबाबत आयोगाने मार्गदर्शन करावे, असा सूर बहुतांश आयुक्तांनी या बैठकीमध्ये लावला.
दरम्यान, या बैठकीबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले पुणे महापालिकेच्या बाबतीत आम्हाला तीन लाख दुबार नावे आढळून आली आहेत. परंतू या याद्या नेलेल्या नागरिकांच्या तक्रारींवरून ही संख्या तीन लाखांहून अधिक असल्याचे समोर येत आहे. हे फक्त शहरातील विविध मतदार संघांपुरते मर्यादीत आहे. एकाच वेळी पुणे महापालिकेच्या हद्दीतील मतदार संघ आणि इतर जिल्ह्यातील मतदारसंघातील याद्यांमध्येही अनेक मतदारांची नावे असल्याच्या तक्रारी आहेत. दुबार मतदार होणार नाही, यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावे अशी मागणी मी यावेळी केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार याद्यांनुसारच आम्ही फोड केली आहे. मतदार यादीतील नावे काढणे अथवा वाढविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. सुरवातीला मतदार याद्यांबद्दल गोंधळ निर्माण झाल्यावर आम्ही उलट तपासणी केली. परंतू मतदार याद्यांमध्येच दोष असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी मतदारांचे पत्ते नाहीत, छायाचित्र नाहीत त्यामुळे हा गोंधळ झाला आहे. महपाालिकेकडे आलेल्या हरकतींपैकी जवळपास १२ हजार हरकतींवर निर्णय घेण्यात आला असून त्रुटी देखिल दूर करण्यात आल्या आहेत. उर्वरीत हरकतींवरील कामही लवकरच पूर्ण करून विहीत मुदतीत याद्या अंतिम मंजुरीसाठी आयोगाकडे पाठविण्यात येतील. लोकसंख्येच्या तुलनेने पुणे शहरातील हरकतींचे प्रमाण हे अन्य छोट्या शहरांपेक्षा कमी असल्याचेही राम यांनी नमूद केले. मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. निवडणूका निष्पक्ष पार पाडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
