Pune Crime News | चुलत भावामुळे पराभव झाल्याचा समज करुन भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी घरात शिरुन शिवीगाळ करुन हात पाय तोडण्याची दिली धमकी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यांच्यामुळे कमी मते पडली, असे समजून भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी चुलत भावाच्या घरात शिरुन कुटुंबाला शिवीगाळ करुन हात पाय तोडण्याची धमकी दिली.

याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मंदार लडकत, प्रितम बनकर, रोहित शिंदे, प्रज्ञा लडकत (रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ संदिप लडकत हे प्रभाग क्रमांक २२ ब काशेवाडी -डायस प्लॉटमधून भाजपचे उमेदवार म्हणून उभे होते. काँग्रेसचे रफीक शेख यांनी संदीप लडकत यांचा पराभव केला.

संदीप लडकत यांचा ३९४ मतांनी पराभव झाला. इतक्या कमी मतांनी पराभव झाल्याने तो संदीप लडकत यांच्या नातेवाईकांच्या जिव्हारी लागला. आपल्या चुलत भावाच्या कुटुंबामुळे कमी मते पडली व ते पराभुत झाले आहे, असे संदीप लडकत यांच्या नातेवाईकांना वाटले. त्याच कारणावरुन आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या घरात शिरले. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करुन, हात पाय तोडण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.

You may have missed