Devendra Fadnavis | विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांकडून पसंतीची मोहोर ! पारदर्शी कारभार करत पुणे सर्वोत्तम पालिका बनवा; मुख्यमंत्री फडणवीस यांची नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अपेक्षा

Devendra Fadnavis | Punekars' preference for development agenda! Make Pune the best municipality by conducting transparent governance; Chief Minister Fadnavis' expectations from newly elected corporators

पुणे : Devendra Fadnavis | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे. पुणेकरांचा हा जनादेश नक्कीच आनंददायी आहे. मात्र, हीच मोठी जबाबदारी असून जनतेच्या विश्वासाला आपण पात्र ठरू अशा पद्धतीने काम करा,’ असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला. केंद्र व राज्य शासन पुणे महापालिकेच्या पाठीशी असून पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी, यासाठी झपाटून प्रामाणिक, पारदर्शी कारभार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,  नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांचाही भावी नगरसेवक असा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यांचेही मनोबल वाढवले.

‘आपण पुण्यात इतिहास रचला असून त्याचे तुम्ही सर्व शिल्पकार आहात, असे सांगून फडणवीस म्हणाले,‘गेल्या ३०-३५ वर्षात पुणे महापालिकेत इतके बहुमत कोणीही मिळवले नाही. पुण्यातील लढत अत्यंत चुरशीची असेल अशी चर्चा झाली. पण पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली. त्याचा आनंद असला, तरी असा जनादेश जबाबदारीची जाणीव करून देतो. जनतेच्या विश्वासाला आपण पात्र ठरलो नाही, तर असा जनादेश लाटेसारखा निघून जातो. मात्र, हाच विश्वास आपण सार्थ केला तर पुढील पंचवीस वर्ष आपल्याला कोणी हटवू शकणार नाही,’.

‘पंतप्रधान मोदी विजयानंतर एकही दिवस शांत बसत नाहीत. दुसऱ्याच दिवशी ते पुढील पाच वर्षांचे नियोजन करतात. तसेच आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे नियोजन करायचे आहे. पुण्यासाठी आपण मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे.  पुण्यासाठी नियोजित केलेल्या योजनांचे प्रत्यक्ष काम दोन वर्षात आपण सुरू करू शकू, असे नियोजन करून काम करा,’असे फडणवीस म्हणाले.

पुणे महापालिका ही देशातील सर्वोत्तम महापालिका झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे. केंद्र व राज्य सरकार, सर्व आमदार, खासदार पुणे महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.  

“महापालिका हा सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे. महापालिका हा आपला व्यवसाय, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे पक्ष  ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याने पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे.  कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही,असे फडणवीस म्हणाले.

‘आपली प्रतिमा हे राजकारणातील सर्वात मोठे धन आहे. तुमची प्रतिमा ही भाजपची प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाऊ न देता सर्वांनी पुणे महापालिकेत काम करावे,’

– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

You may have missed