Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युचा तपास सीआयडीकडे; बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद
पुणे : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती परिसरात विमान अपघातात मृत्यु झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद बारामती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शासनाच्या आदेशानुसार याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे.
याबाबत सीआयडीचे प्रमुख सुनिल रामानंद यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. याचा तपास सीआयडीकडे आला आहे. त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे, आवश्यक ती माहिती गोळा करण्यास सीआयडीने सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला. पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आदेशानुसार सीआयडीही तपास करणार आहे.
