Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | श्री महालक्ष्मी मंदिरात फरारी गर्ल डायना पंडोल, ऑक्सिजन वूमन सुमेधा चितळे, स्नेहवनच्या सत्यभामा देशमाने या ‘‘नारी तू नारायणी’’ पुरस्कारांनी सन्मानित (Video)
पुणे : Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | श्री महालक्ष्मी मंदिरात फरारी गर्ल डायना पंडोल, ऑक्सिजन वुमन सुमेधा चितळे, स्नेहवन च्या सत्यभामा बाबासाहेब देशमाने यांना महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते ‘‘नारी तू नारायणी ’’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले आदि मान्यवर उपस्थित होते.भारतीय महिला कार रेसिंग ड्रायव्हर असलेल्या डायना पंडोल यांनी भारतीय मोटार स्पोर्टसच्या इतिहासात अनेक मोठे विक्रम रचले आहेत. त्या भारतातील पहिली महिला नॅशनल रेसिंग चॅम्पियन बनल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे खुल्या स्पर्धेत पुरुष ड्रायव्हर्सना मागे टाकून हे यश मिळवले. डायना पंडोल या आतंरराष्ट्रीय स्तरावर फेरारी कार चालवून रेसिंग करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
सुमेधा चितळे या ‘‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन’’ च्या संस्थापक असून त्यांना ‘‘ऑक्सिजन वुमन’’ म्हणून ओळखले जाते. सियाचेन येथील जवानांसाठी आतापर्यंत १७ कोटी २० लाखांचे ४ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट तसेच अन्य प्रकल्पांशी उभारणी केली आहे. अजून २० कोटींच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. सियाचेनमधील सैनिकांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावर ४ वर्षे अभ्यास करुन तो प्रश्न समजावुन घेऊन मग ऑक्सिजन प्लांट उभारणी केली. राष्ट्राने आपल्याला काय दिले, याचा विचार करण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देतो, याचा विचार करा. आत्मकेंद्री ते राष्ट्र केंद्री होण्याचा प्रयत्न करा, असा संदेश सुमेधा चितळे यांनी उपस्थितांना दिला.
परभणीमधील सत्यभामा बाबाराव देशमाने या १०० मुलांची आजी आहे. स्नेहवन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुलांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळले. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलांसाठी आळंदीजवळ निवासी प्रकल्प आहे. आता त्यांचा मुलगा अशोक आणि सुन अर्चना हे सर्व व्याप सांभाळतात. सत्यभामा देशमाने हे अजूनही या मुलांच्या स्वयंपाक आणि दुध दुभते यांची कामे करत असतात. अशा या तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना ‘‘नारी तू नारायणी ’’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, श्री महालक्ष्मी मंदिराच्या पवित्र वास्तूमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होत आहे. समाजासाठी काम करणार्या महिलांचे कर्तृत्व जगासमोर आणले पाहिजे. त्यांच्या कामातून इतरांना दिशा मिळावी़, असा प्रयत्न आहे.
उत्सव प्रमुख तृप्ती अग्रवाल यांनी सांगितले की, प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्ती, सरस्वती, महाकाली चा वास असतो. नवरात्रोत्सवात त्यांच्या कार्याचा गौरव करावा, जेणे करुन इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल, असा आमचा प्रयत्न असतो. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज लाहोटी यांनी केले.
