Pune Crime News | पुणे : प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याच्या संशयावरून वारजे पोलिसांकडून 5 जण ताब्यात; केले मुंबई पोलिसांच्या हवाली
पुणे : Pune Crime News | प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याच्या संशयावरून पाच जणांना वारजे पोलिसांनी पहाटे जेरबंद केले आहे.
अमन आनंद मारोठे (वय २७), आदित्य ज्ञानेश्वर गायके (वय १९), सिद्धार्थ दिपक येणपुरे (वय २०), समर्थ शिवशंकर पोमाजी (वय १८) आणि स्वप्निल बंडू सकट (वय २३) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी १२ जणांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यात एक जण बाजूला मोटारसायकल लावून इमारतीसमोर चालत येतो, इमारतीवर पाच गोळ्या झाडतो आणि चालत परत मोटारसायकलपर्यंत येऊन त्यावरुन निघून जातो, असे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला. संशयितांचे लोकेशन पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचे दिसून आले. मुंबई गुन्हे शाखेने वारजे पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली़ वारजे पोलिसांनी कर्वेनगरमधून ५ जणांना ताब्यात घेतले़ त्यांना मुंबई गुन्हे शाखेच्या सुपूर्त करण्यात आले आहे.
