Pune Crime News | ट्रायल  घेऊन  येतो, असे सांगून दीड लाखांची मोटारसायकल घेऊन चोरटा झाला फरार

crime

पुणे : Pune Crime News |  जुनी वाहने खरेदी विक्री व्यवहार करणार्‍या व्यावसायिकाकडे बतावणी करुन ट्रायल घेऊन येतो, असे सांगून तरुणाने एझडी स्क्रॅमलर ही मोटारसायकल घेऊन तो फरार झाला.

याबाबत वसीम नफीस शेख (वय ३६, रा. महंमदवाडी) यांनी काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसरमधील सय्यदनगर येथील सहारा अ‍ॅटोमध्ये ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जुनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चोरटा दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. दुचाकी खरेदी करण्याची बतावणी त्याने व्यावसायिकाकडे केली. त्याने तोंडाला काळा मास्क व डोक्यावर काळी कॅप, निळे स्पोर्ट जॅकेट घातला होता. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन एझडी स्क्रॅमलर ही १ लाख ४० हजार रुपयांची मोटारसायकल पसंत केली. त्यानंतर त्याने ट्रायल घेऊन येतो, असे सांगून तो मोटारसायकल घेऊन गेला. फिर्यादी यांनी बराच वेळ वाट पाहिली. पण तो परत आला नाही. तेव्हा त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यातील चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. परंतु, त्याने तोंडाला मास्क घातला असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.  पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करत आहेत.

You may have missed