Pune PMC News | कसबा विधानसभा मतदार संघात घरांघरांतून कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त 400 कचरा सेवकांची नियुक्ती

Pune PMC News

आमदार आणि महापालिका प्रशासनाने ‘यांत्रिक पद्धतीऐवजी ‘स्वच्छ संस्थेच्या ’ कामावर केले शिक्कामोर्तब !

पुणे : Pune PMC News | कसबा विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या ‘शून्य कचरा प्रकल्प’ अभियानाअंतर्गत दररोज घरोघरी जावून कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी स्वच्छ संस्थेच्या अतिरिक्त ४०० कचरा वेचकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. दरम्यान, विमाननगरमध्ये यांत्रिक पद्धतीने कचरा गोळा करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करून संपुर्ण शहरात याच पद्धतीने कचरा गोळा करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला होता. परंतू कसबा मतदार संघात घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेचे अतिरिक्त ४०० कचरा वेचक नेमल्याने यांत्रिक ऐवजी स्वच्छ संस्थेच्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब केले आहे.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ, नगरसेवक अजय खेडेकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, पल्लवी जावळे, कल्पना बहिरट, स्नेहा माळवदे, ऐश्वर्या थोरात, विशाल धनवडे, देवेंद्र वडके, राघवेंद्र मानकर, महेश आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, कचरावेचकांची संख्या वाढल्याने सुट्टीच्या दिवशी ही कचरा संकलनाची अखंडित सेवा देता येणार आहे. जुने वाडे, चाळी, बैठी घरे आणि वस्ती विभागातील रहिवाशांवर सेवा शुल्काचा भार पडू नये यासाठी महानगरपालिका कचरावेचकांना दरमहा घरटी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देणार आहे. लक्ष्मी रस्ता परिसरातील दुकाने आणि पथारी व्यावसायिकांकडून संध्याकाळीही कचरा संकलित केला जाणार आहे.

राम म्हणाले, डिसेंबर २०२६ पर्यंत पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. गेले वर्षभर आमदार रासने यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. बहुतांश फिडर पॉईंट व क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शून्य कचरा प्रकल्प या मतदारसंघात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात राबवला जाणार आहे.

अखेर स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकच विश्‍वासार्ह

स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरावर्षांहून सुमारे चार हजार कचरावेचक शहरातील ८० टक्के घरांतून ओला व सुका कचरा गोळा करत आहेत. परंतू पाच वर्षांपुर्वी कष्टकर्‍यांच्या या संस्थेचे काम काढून घेउन दुसर्‍या एका खाजगी कंपनीला देण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हालचाली केल्या होत्या. विशेष असे की, विद्यमान आमदार हेमंत रासने हेच योगायोगाने स्थायी समितीचे अध्यक्ष होते. स्वच्छ संस्थेचा अगोदरचा करार संपुष्टात आल्याने नव्याने करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर लवकर निर्णय होता संस्थेला केवळ एक- दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत होती. कचर्‍यावरच स्वाभीमानाचा उदरनिर्वाह असलेल्या संस्थेच्या कर्मचार्‍यांनी रोजगार जाण्याच्या भितीने विविध प्रकारे आंदोलनही केले होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याप्रकरणामध्ये लक्ष घातले होते. अखेर तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप करत घरोघरी जावून कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेकडेच राहील असे जाहीर केले.

दरम्यान, प्रशासक काळात यांत्रिक पद्धतीने घरोघरी जावुन कचरा गोळा करण्यासाठी विमाननगर परिसरात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रयोगातही हवे तसे यश मिळत नसल्याचे समोर आले आहे. कचरा गाडी ठराविक वेळेत येत असल्याने गाडी गेल्यानंतर नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या गाडीत ओला व सुका कचरा एकत्रच घेतला जात असल्याने रॅम्पवरील मिक्स कचर्‍याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम कचर्‍यावरील प्रक्रियेवर होत आहे. प्रशासनाने कसबा मतदार संघात यांत्रिक पद्धतीने कचरा गोळा करण्याऐवजी अतिरिक्त ४०० कचरा वेचकांची नियुक्ती केल्याने उपलब्ध पर्यायांमध्ये स्वच्छ संस्थाच विश्‍वासार्ह असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

You may have missed