Pune Crime News | बेपत्ता झालेल्याच्या पत्नीची माहिती असल्याच्या संशयावरुन कॅबचालकाच्या डोक्यात बियरची बाटली घालून केले जखमी
पुणे : Pune Crime News | बेपत्ता असलेल्या पत्नीची माहिती असून तो तिच्याबरोबर बोलत असतो, तरीही माहिती नाही, असे सांगितल्यावरुन वाद झाल्याने त्याने कॅबचालक मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली घालून त्याला जखमी केले.
याबाबत संदिप सुरेश घोडके (वय २५, रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तेजस पवार (वय ४०, रा. आंबेगाव पठार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवर १४ मे रोजी रात्री आठ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस पवार यांची पत्नी संदिप घोडके याच्या कॅबने ये जा करत होती. त्यामुळे त्यांची ओळख होती. तेजसची पत्नी ही गेले काही दिवस बेपत्ता झाली होती. पवार यांनी तिची मिसिंगची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली होती. १४ मे रोजी संदिप घोडके व तेजस पवार यांनी मिळून तिचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. त्यानंतर ते स्वामी नारायण मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवर रात्री बियर पिण्यास बसले. यावेळी बोलत असताना तेजस पवार याने ती तुझ्यासोबत बोलत असते. आता कोठे आहे, असे विचारले. त्यावर संदिप घोडके याने मला काही माहिती नाही, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तेजस पवार याने बियरची बाटली संदीप घोडके याच्या डोक्यात घालून जखमी केले. घोडके यांनी जखमेवर उपचार केल्यानंतर आता फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.
