Maharashtra DGP | पुण्यातील गुंडगिरीचा बिमोड करण्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे आदेश; पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा घेतला आढावा
पुणे : Maharashtra DGP | पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील गुंडगिरीचा बिमोड करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिले.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी घटनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाषाण येथील बिनतारी संदेश विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयककुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
अमली पदार्थ तस्करी, छुप्या पद्धतीने होणार्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले. शहर आणि जिल्ह्यातील गुंड टोळ्या, सराईतांविरुद्ध केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती या वेळी अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, संदीपसिंग गिल यांनी दिली. जिल्हा परिषदेची निवडणूक शनिवारी (७ फेब्रुवारी) होणार आहे. त्याअनुंषगाने तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा दाते यांनी घेतला. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या विस्तार वाढत आहे. जिल्ह्यात औद्योगिक वसाहती आहेत. मोठ्या संख्येने राज्यातून, तसेच परराज्यातून नागरिक शहर, जिल्ह्यात रोजगारासाठी स्थायिक होत आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात तसेच शहरामधील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश पोलीस महासंचालक दाते यांनी बैठकीत दिले.
