Bhimashankar Temple News | भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीला बंद ठेवण्याच्या निर्णयावर आक्षेप; मंदिर खुले करण्याची मागणी

Bhimashankar Temple News | Objection to the decision to close Bhimashankar Jyotirlinga Mahashivratri; Demand to open the temple

पुणे : Bhimashankar Temple News | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय असंवैधानिक, बेकायदेशीर आणि प्रशासकीय मनमानी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आदेश कोट्यवधी शिवभक्तांच्या श्रद्धेवर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकाला उपासनेचा मूलभूत अधिकार आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कारणावरून उपासनेवर संपूर्ण बंदी लादणे हा प्रमाणबाह्य उपाय असून न्यायालयात टिकणार नाही, असेही म्हटले आहे. वेळापत्रकानुसार दर्शन, टप्प्याटप्प्याने प्रवेश, पोलिस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रण यांसारखे कमी निर्बंधात्मक पर्याय उपलब्ध असतानाही पूर्ण बंदी घालणे म्हणजे मूलभूत अधिकारांची पायमल्ली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

लाखो भाविक वर्षभर महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी नियोजन करतात. त्यांचा खर्च, उपास-तापास आणि भक्ती लक्षात न घेता मंदिर बंद ठेवणे म्हणजे श्रद्धेची गळचेपी असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर तात्काळ खुले करावे, विशेष सुरक्षा व गर्दी नियंत्रण आराखडा जाहीर करावा आणि बंदीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

पतित पावन संघटनेतर्फे हे निवेदन देण्यात आले. यावेळी स्वप्निल नाईक, मनोज पवार, स्वप्निल आंग्रे आणि राजाभाऊ रजपूत उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत महाशिवरात्रीला पूजा करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

You may have missed