Pune Crime News | सराफांची फसवणुक करणार्या निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून केली अटक
पुणे : Pune Crime News | वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे नाव सांगून सराफांकडून सोन्याचे दागिने खरेदी करुन तसेच महिलांची फसवणूक केलेल्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.
गणेश अशोक जगताप Ganesh Ashok Jagtap (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
गणेश जगताप याने राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी आपल्या सीआरमधील शिक्षा झालेली पाने काढून खोटी कागदपत्रे जोडली होती. २०११ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी जगतापसह दोन लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने सराफांसह महिलांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते.
जगताप याच्यावर भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी आणि कोथरुड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जगताप याला निलंबित केल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल असलेले भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी, कोथरुड पोलिस ठाण्याची पथके मागावर होती.
दोन दिवसापूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांना जगताप आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरु गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने रविवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी जगताप याला ताब्यात घेतले. जगताप हा एका भाड्याच्या खोलीत तेथे रहात होता. तो फुलपथरू गावातील एका मंदीरात अधून-मधून दर्शनाला जात होता़ पोलिसांनी गावात पोहचल्यानंतर त्या मंदीरातील पुजार्याला जगताप याचा फोटा दाखविला. त्यांनी तो ओळखला. त्यावेळी तो राहत असलेली खोली पोलिसांना सापडली. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पार्लर व्यवसायिक महिलेची अडीच लाखाहून अधिक रोकड, सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली होती. पत्नीच्या आजारपणाचा बहाणा करून, तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीनुसार जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याच्याअगोदर देखील जगताप याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिन्यात दाखल झाला होता. दरम्यान २१ ऑगस्ट २०२४ मध्ये जगताप याची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र हजर न राहता त्याने यादरम्यान औंध येथील आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकडून जगताप याने पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकार्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. ही घटना समोर आल्यानंतर विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप याला निलंबित केले होते.
