Maharashtra Weather | राज्यात थंडीचा निरोप; मुंबई-पुण्यात उन्हाचा चटका वाढणार, हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather

पुणे/मुंबई :  Maharashtra Weather | राज्यातील थंडी आता जवळपास संपुष्टात येत असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मुंबईसह पुणे आणि राज्यातील बहुतांश भागांत तापमान हळूहळू वाढत असून, पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आठवडाभर आकाश निरभ्र राहील आणि दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे.

मुंबईत सध्या सकाळच्या वेळी किंचित गारवा जाणवत असला, तरी दुपारपर्यंत उकाडा वाढत आहे. किमान तापमान सुमारे १८ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ११ ते १२ फेब्रुवारीदरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असून, दुपारी बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही सकाळी वातावरण कोरडे राहील; मात्र दुपारी उन्हाचा प्रभाव कायम राहणार असून, तापमान ३३ अंशांच्या आसपास राहील.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अजूनही पहाटे हलका गारवा जाणवत असला, तरी दुपारच्या तापमानात वाढ होत आहे. किमान तापमान १४ ते १६ अंशांदरम्यान तर कमाल तापमान ३१ ते ३३ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत सकाळची थंडीही कमी होणार असून उष्णतेची तीव्रता वाढणार आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही थंडी ओसरली आहे. सकाळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारी तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच राज्यात आता हिवाळ्याचा प्रभाव कमी होत असून, उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हापासून संरक्षण घेण्याचा सल्ला हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे.