Vande Mataram | ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजणार; राष्ट्रगीतावेळी उभे राहणे अनिवार्य, केंद्राचे नवे मार्गदर्शक तत्त्व

Vande Mataram | 'Vande Mataram' will be played before 'Jana Gana Mana'; Standing during the national anthem is mandatory, the Center's new guideline

नवी दिल्ली :  Vande Mataram | केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रतीकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेत वंदे मातरम् आणि जन गण मन यासंदर्भातील नवे नियम स्पष्ट केले आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिकृत शासकीय कार्यक्रमांमध्ये आता जन गण मनपूर्वी वंदे मातरम् वाजवणे आवश्यक राहील. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्हींचा सन्मान राखत राष्ट्रीय भावना दृढ व्हावी, या उद्देशाने ही अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या नियमानुसार सरकारी कार्यक्रम, शासकीय शाळांचे समारंभ, औपचारिक शासकीय मेळावे तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल उपस्थित असलेले कार्यक्रम यामध्ये वंदे मातरम् आधी आणि त्यानंतर जन गण मन वाजवले जाईल. त्या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी आदराने उभे राहणे बंधनकारक असेल. राष्ट्रगीत पूर्ण स्वरूपात सुमारे ३ मिनिटे १० सेकंद वाजवले जाणार असून आतापर्यंत अनेक ठिकाणी केवळ पहिले दोन कडवे सादर करण्याची प्रथा होती.

मात्र चित्रपटगृहांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच सिनेमागृहांमध्ये पूर्वीप्रमाणेच राष्ट्रगानाबाबतचे विद्यमान नियम लागू राहतील.

वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी) यांनी लिहिलेले राष्ट्रगीत असून स्वातंत्र्यलढ्यात त्याने देशभक्तीची प्रेरणा दिली होती, तर जन गण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले भारताचे अधिकृत राष्ट्रगान आहे. नव्या सूचनांमुळे या दोन्ही राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान अधिक स्पष्टपणे पाळला जाईल, असा सरकारचा उद्देश आहे.

You may have missed