Pune Mundhwa Crime News | पुण्यात होळीच्या कार्यक्रमात दुर्घटना; स्टेजचा काही भाग कोसळला
पुणे : Pune Mundhwa Crime News | राज्यभर धुळवडीच्या उत्साहात सण साजरा होत असताना पुण्यातील होळीच्या एका कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली. मुंढवा परिसरातील रॉयल पाम्स येथे आयोजित करण्यात आलेल्या होळी इव्हेंटमध्ये स्टेजचा काही भाग अचानक कोसळला.
प्राथमिक माहितीनुसार, स्टेज उभारणीसाठी लावलेला आडवा लोखंडी बीम अचानक कोसळल्याने काही जण जखमी झाले. ही घटना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दुपारच्या सुमारास घडली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
