Pune Crime News | आत्या जेव्हा सासु होते…; विवाहितेने गळफास घेऊन संपविले आपले जीवन, सासु आणि पतीवर गुन्हा दाखल

Pune Crime News | When Aunty became Mother-in-law...; Married woman ends her life by hanging herself, case registered against mother-in-law and husband

पुणे : Pune Crime News | मुलगी नाही, म्हणून ऊसतोड कामगार असलेल्या भावाच्या ५ वीतील मुलीचा तिने सांभाळ केला. आपल्या मुलाबरोबर तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर तिच्यातील सासु जागी झाली. लहानपणापासून सांभाळ केलेल्या मुलीचा जाच सुरु झाला. पती दारु पिऊन माहेरहून पैसे आणण्यासाठी मारझोड करु लागला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. पोलिसांनी पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्षा जयसिंग कदम (वय २१) असे मृत्यु पावलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत तिचे वडिल बन्सी योगीराज खामकर (वय ४०, रा. तरनळी, पो. धारु, ता. केज, जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सासु हौसाबाई मधुकर कदम (वय ५५), जयसिंग मधुकर कदम (वय २९, दोघे रा. शिवराज पार्क, डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामकर हे ऊस तोडीसाठी जात असल्याने त्यांची बहिण हौसाबाई कदम हिला मुलगी नसल्याने त्यांची प्रतिक्षा ही मुलगी ५ वी पासून तिच्याकडे होमखेल येथे रहायला होती. खामकर यांच्या मुलीचा बहिण हौसाबाई हिने सांभाळ केला. तिचा मुलगा जयसिंग याच्याबरोबर प्रतिक्षाचा विवाहाचा प्रस्ताव दिला. त्यांनी तो मान्य करुन ९ मे २०२३ रोजी त्यांच्या मुळगावी थाटामाटात विवाह करुन दिला. सर्व खर्च खामकर यांनी केला. लग्नात जयसिंग याला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी केली. लग्नानंतर ५ ग्रॅमची अंगठी घालण्याचे ठरले होते.

लग्नानंतर ६ महिन्यांनी प्रतिक्षा ही वडिलांना फोन करुन जयसिंग ५ ग्रॅमची अंगठी मागत आहे. त्यावरुन सतत टोमणे मारत असल्याचे सांगत. लग्नात खर्च झाल्याने थोड दिवसात अंगठी देतो, असे सांगितले. त्यानंतर थोडे दिवस ते चांगले वागले. प्रतिक्षा ही बीडमधील मामाच्या घरी बाळंत झाली. तिला मुलगी झाल्याने ते दोघे पाहण्यासुद्धा आले नाही. बाळंतपणानंतर सासरी आलेल्या प्रतिक्षाला घरातील सर्व कामे करण्यास सांगत.

जयसिंग हा फरशी बसविण्याचे काम करतो. तो सतत दारु पिऊन येऊन मारहाण करत असल्याचे प्रतिक्षा सांगत होती. जानेवारी २०२६ मध्ये जयसिंग याने मारुती स्विफ्ट डिझायर कार घेतली. गाडीचे हप्ते फेडण्यासाठी ते पैशांची मागणी करु लागले. १७ एप्रिल रोजी सकाळी जयसिंग याने फोन करुन मुलीला तुम्ही हेच शिकवले का, असे म्हणून प्रतिक्षा हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रतिक्षा ओरडत असल्याचा आवाज त्यांना फोनवर येत होता. त्यांनी जयसिंग याला मुलीला आणून घरी सोड नाही तर मी उद्या न्यायला येतो, असे सांगितले. पण, ती वेळच आली नाही. सासरी होणार्‍या छळाला कंटाळून प्रतिक्षा हिने रात्री ११ वाजता गळफास घेऊन आपले जीवन संपविले. वाघोली पोलिसांनी पूर्वीची आत्या आणि आताची सासु व पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.

You may have missed