Pune Police Bandobast | विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्त, गणेश मंडळे, महिला, मुलांना कोणतीही अडचण न येता, गर्दीच्या व्यवस्थापनाला पोलिसांचे प्राधान्य
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतला विसर्जन मार्गाचा आढावा; काढला रूट मार्च
पुणे : Pune Police Bandobast | विसर्जन मिरवणुक किती तास चालली, हे आमच्या दृष्टीने महत्वाचे नाही. यापेक्षा मिरवणुकीत गणेश भक्त, गणेश मंडळे, महिला सुरक्षा, लहान मुले यांना कोणतीही अडचण येऊ नये, गर्दीचे व्यवस्थापन हे आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे़ मिरवणुक शांततेत, सुरक्षित आणि सुनियोजित पद्धतीने पार पडेल, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकापासून अलका टॉकीज जवळील संभाजी चौकापर्यंत पाहणी केली. पोलिसांनी काढलेल्या रूट मार्चनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील चार मुख्य विसर्जन मार्गावर साडेपाच हजार पोलीस अधिकारी, अंमलदार तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून बंदोबस्त सुरु होणार आहे.
विसर्जन मार्गावर काही अडचणी आहेत का़, गणेश मंडळांना कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची पाहणी यावेळी केली.
ड्रोन कॅमेराला परवानगी नाही
कोणालाही ड्रोन कॅमेरा उडविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून ड्रोन कॅमेर्याद्वारे केलेले चित्रिकरण मागितल्यास त्यांना मिळू शकते. काही मंडळांनी आमचा गणपती मिरवणुकीत आल्यावर ड्रोन कॅमेराला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांना १० ते १५ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.
स्थिर वादनासाठी १० मिनिटे
प्रत्येक मंडळाला २ ढोल ताशा पथकांना परवानगी दिली आहे. मंडळे आणि ढोलताशा पथकांच्या आम सहमतीने प्रत्येक चौकात १० मिनिटे वादन करता येणार आहे.
मध्यरात्री १२ नंतर काय?
मध्यरात्री १२ नंतर स्पिकरला बंदी असल्याने कुमठेकर, केळकर रोडवरील मंडळे जागीत थांबून राहतात. याविषयी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, काही गोष्टी या पारंपारिक पद्धतीने होत असतात. आमची भूमिका जोर जबरदस्तीने काही करण्याची नाही. प्रेमाने आणि आम सहमतीने मिरवणुक पूर्ण करण्यावर भर राहिल. दोघांना त्रास होणार नाही. मंडळ पूर्ण वर्षभर या दहा दिवसांची वाट पहात असतात. त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर आहे. त्या लक्षात घेऊन सर्व अशा गोष्टींचे निराकरण करु, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात. या गर्दीचे व्यवस्थापन करणे, महिलांची सुरक्षितता तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना मिरवणुकीत त्रास होऊ नये, हे पाहण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल. कोठेही गडबड, गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.
अपवादात्मक घटनांशी सामना करण्यासाठी पोलिसांचे विशेष युनिट मिरवणुक मार्गावर तैनात करण्यात आली आहेत. तसेच वाहतूक शाखेने वाहतूकीतील बदलाबाबतच्या सुचना सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत, त्या पाहून नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
