Pune Crime News | फ्लॅटच्या बुकिंगसाठी पैसे घेऊन 51 जणांची फसवणूक करणार्‍या इन्फ्राटेक कंपनीचे मालक किसन राठोडसह 13 जणांवर गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फ्लॅट तसेच मोकळे प्लॉट देण्याचे आमिष दाखवुन बुकिंगसाठी पैसे घेऊन ५१ जणांची ८९ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन इन्फ्राटेक कंपनीचे मालक किसन धावजी राठोडसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्फ्राटेक कंपनीचे मालक किसन धावजी राठोड (Kisan Dhavji Rathod), सुशालीनी किसन राठोड (Sushalini Kisan Rathod), शिवकन्या राठोड (रा. कौडगाव हुडा, बीड), प्रणवी भागवत आणेराव Pranavi Bhagwat Anerao (रा. कात्रज), चैत्राली विशाल दहिवाल Chaitrali Vishal Dahiwal (रा. धायरी), संजना राठोड (रा. हडपसर), अनिल शंकर देशमुख Anil Shankar Deshmukh (रा. धायरी फाटा), हनुमंत बाळू गोरे Hanumant Balu Gore (रा. रहाटवडे, कोंढणपूर, ता. हवेली), राजेश रंगराव काकडे Rajesh Rangrao Kakade (रा. नांदेड सिटी), बाळासाहेब कोंडिबा घोगरे Balasaheb Kondiba Ghogre (रा. मानाजीनगर, नर्‍हे), अभिषेक चंद्रशेखर सासवडे Abhishek Chandrashekhar Saswade (रा. वारजे माळवाडी), सागर गोळे, अमोल गोरे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वंदना ज्ञानदेव खंदारे (वय ३८, रा. अप्पर ओटा इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ पासून १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या परिचारिका म्हणून काम करीत असून स्वत:च्या मालकीचे घर घ्यावे या विचाराने त्या घर शोधत होत्या. जुलै २०२३ मध्ये सोशल मीडियावर इन्फ्राटेक कंपनीतर्फे कात्रज व्हॅली या प्रोजेक्टमध्ये फ्लॅटचे बुकींग करुन स्वस्त व किफायतशीर दरामध्ये फ्लॅट देत असल्याची जाहिरात पाहिली.

 त्यांनी कार्यालयात फोन केल्यावर  मॅनेजर अमोल गोरे याने बुकिंग करता मांगडेवाडी येथील कार्यालयात येण्यास सांगितले. त्यांनी ८ लाख व १४ लाख रुपयांचे फ्लॅट बुक करुन २ लाख रुपये भरले. त्यानंतर कंपनीतर्फे चैत्राली दहिवाळ हिने समजुतीचा करारनामा केला. सागर गोळे, अमोल गोरे यांनी आम्ही ६ महिन्यानंतर कात्रज व्हॅली स्कीमचे भूमीपुजन करणार आहोत. करारनामा केल्यानंतर ६ महिने होऊन गेले तरी कंपनीकडून बांधकाम सुरु झाल्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्यामुळे त्या मांगडेवाडी येथील इन्फ्राटेकचे कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर इन्फ्राटेक कंपनीच्या विरोधात बरेच लोक जाऊन बुकिंगचे दिलेले पैसे परत घेत असल्याचे समजले.

त्या बुकिंग रद्द करुन पैसे परत घेण्यासाठी गेल्या़ मॅनेजर अमोल गोरे, चैत्राली दहिवाळ, सागर गोळे यांनी कंपनीतील काम सोडल्याचे समजले. तेथील स्टाफला भेटल्यावर त्यांनी आम्ही तुमचे पैसे घेतलेले नाहीत. तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणाले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. चौकशी दरम्यान समजले की, गृहनिर्मिती प्रकल्पामध्ये फ्लॅट तसेच मोकळे प्लॉट देतो, असे सांगून बुकिंग रक्कम भरुन घेऊन देखील फ्लॅटचा  तसेच मोकळ्या प्लॉटचा ताबा इन्फ्राटेक कंपनीतर्फे दिला गेला नाही. त्यांच्याबरोबर ५१ जणांची ८९ लाख ७ हजार रुपयांची कंपनीने फसवणुक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

You may have missed