Pune Crime News | वादावादीतून तरुणीने लॉजमधील सिलिंग फॅनला गळफास घेऊन केली आत्महत्या; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | दोघांमध्ये झालेल्या वादावादीतून तरुण अचानक निघून गेला. त्यानंतर तरुणीने लॉजमधील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. विश्वास वामनराव जगताप Vishwas Vaman Jagtap – Deshmukh (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना हडपसर येथील वॉव लॉज येथे २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. याबाबत साक्षी हिच्या वडिलांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि विश्वास जगताप यांची एकमेकांशी ओळख होती. २०२२ मध्ये विश्वास जगताप त्रास देत असल्याची तक्रार तिने वडिलांकडे केली होती. त्यावेळी त्यांनी विश्वास जगताप याला माझ्या मुलीशी संबंध ठेवू नकोस, असे सांगितले होते. त्यानंतरही त्याचे साक्षीशी संबंध होते. त्यांच्यात वारंवार वादावादी होत असत. २४ सप्टेंबर रोजी दोघे हडपसरमधील वॉव लॉज येथे गेले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. तेव्हा विश्वास जगताप हा लॉजमधून रागाने निघून गेला. त्याच्या त्रासाला कंटाळून साक्षी हिने रुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी विश्वास जगताप याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.

You may have missed