Pune Crime News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीमचालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या; पोलिसांनी पत्नीवर केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक कारणावरुन घरात होत असलेला त्रास तसेच पत्नी वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने कंटाळून जीमचालकाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अविनाश अशोक शेळके (वय ३५, रा. साठे वस्ती, स्वामी समर्थ मठाजवळ, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई रेखा अशोक शेळके (वय ६३) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रुबी भिसे ऊर्फ रुबी अविनाश शेळके Ruby Bhise alias Ruby Avinash Shelke (वय ३४, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहते घरात २२ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शेळके याचा जीमचा व्यवसाय होता. त्यांचे २०२३ मध्ये रुबी भिसे हिच्याबरोबर लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात घरगुती कारणावरुन वादावादी सुरु झाली. रुबी ही घरगुती काम न करणे, घरात आल्यावर पाणी न देणे, अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे होत होती. रुबी ही फिर्यादीला वेळोवेळी शिवीगाळ करत. तसेच अविनाश याला हाताने मारहाण करत होती. या मानसिक व शारीरीक त्रासाला कंटाळून अविनाश शेळके याने २४ सप्टेंबर रोजी दुपारी बेडरुममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी रुबी भिसे ऊर्फ रुबी अविनाश शेळके हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करीत आहेत.
