Pune Railway Station Parking | पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्किंग ठेकेदाराचा परवाना रद्द; कंपनीला २ लाखांचा दंड
पुणे: Pune Railway Station Parking | पुणे रेल्वे स्थानकासमोरील अधिकृत वाहनतळाचे कामकाज पाहणाऱ्या कंपनीचा परवाना रेल्वे प्रशासनाने वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतर रद्द केला आहे. संबंधित कंपनीला ₹२ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने यापूर्वी कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कामकाजात सुधारणा करण्याची संधी दिली होती. वाहनतळाची अचानक तपासणीही करण्यात आली. मात्र, त्यानंतरही प्रवाशांच्या तक्रारी कायम राहिल्याने अखेर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे पावणे दोन लाख प्रवाशांची ये-जा होते. स्थानकासमोरील अधिकृत वाहनतळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. या वाहनतळाचा ठेका हैदराबादस्थित कंपनीला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारी वाढू लागल्या होत्या.
ठेका सुरू झाल्यापासून कंपनीविरोधात एकूण ३६ तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकृत वाहनतळाचा वापर करतानाही जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या होत्या.
वारंवार सूचना आणि दंडात्मक कारवाईनंतरही अपेक्षित सुधारणा न झाल्याने रेल्वे प्रशासनाने कंपनीचा परवाना रद्द करून ₹२ लाखांचा दंड ठोठावला आहे. वाहनतळाचे कामकाज आता दुसऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.
पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी वारंवार तक्रारी आणि कामकाजात सुधारणा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
