Chakan-Hinjewadi News | पुणे: चाकण पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत विकासासाठी 1,400 कोटी; हिंजवडीच्या कोंडीमुक्तीसाठी 426.54 कोटींचा आराखडा

Chakan-Hinjewadi News | Pune: ₹1,400 crore for traffic congestion relief and infrastructure development in the Chakan belt; a ₹426.54 crore plan to alleviate congestion in Hinjawadi.

पुणे: Chakan-Hinjewadi News | चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या, अपुरे रस्ते आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ₹१,४०० कोटींच्या एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हिंजवडीतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी स्वतंत्र ₹४२६.५४ कोटींचा आराखडाही प्रस्तावित करण्यात आला आहे.

चाकणमधील कामांना येत्या डिसेंबरपासून सुरुवात करण्याचे नियोजन असून, पुढील पावसाळ्यापूर्वी वाहतूक व्यवस्था आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यात लक्षणीय सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. यासोबतच पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढवणे, पदपथ तसेच रस्ते सुरक्षेच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी चाकणमधील सुमारे ४९८ किलोमीटर रस्त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून चाकणकडे येणाऱ्या कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्याच्या दृष्टीने सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात एआय-आधारित वाहतूक सिग्नल आणि नियंत्रण यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. तसेच, मोठ्या वाहनांमुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी MIDC परिसरात पाच ठिकाणी पार्किंगची सुविधा प्रस्तावित आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ₹४२६.५४ कोटींच्या आराखड्यात विविध पायाभूत उपाययोजनांचा समावेश आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित सुविधांसाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान तैनात करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

You may have missed