Pune PMC News | पुणे: 90 कोटींच्या रस्त्याच्या निविदेवरून महापालिका आयुक्तांनाच ‘ॲट्रॉसिटी’ची धमकी; पण, मनपाकडून रस्त्याचे काम पात्र ठेकेदारालाच
पुणे: Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ₹९० कोटींच्या रस्ते निविदेसंदर्भात आपल्याला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संबंधित सत्ताधारी आमदाराचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही.
ही निविदा आरटीओ परिसर ते बंडगार्डन पूल यांना जोडण्यासाठी मुळा-मुठा नदीकाठाने प्रस्तावित वेलस्ली रस्त्याशी संबंधित आहे. हा रस्ता सुमारे दोन किलोमीटर लांब आणि १७ मीटर रुंद प्रस्तावित आहे.
या कामासाठी आठ ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. एका ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी दबाव असल्यामुळे ही प्रक्रिया काही महिने रखडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी पथ विभागाला नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
ज्या ठेकेदाराला अपात्र ठरवण्याचा दबाव असल्याचे सांगितले जात होते, त्याचीच निविदा पात्र ठेकेदारांमध्ये सर्वात कमी दराची ठरल्याने त्याला काम देण्यात आले.
संबंधित ठेकेदाराने पूर्वगणनपत्रकापेक्षा सुमारे १२ टक्के कमी दराने निविदा भरल्यामुळे पुणे महापालिकेची सुमारे ₹८.५ ते ₹९ कोटींची बचत होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या ठेकेदाराने अंदाजित खर्चापेक्षा सुमारे १ टक्का कमी दर दिल्याचे वृत्त आहे.
