Pune Crime News | ग्रंथालयाची तोडफोड करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन नगरसेविका प्रिया गदादे पाटील, सुरज लोखंडे यांच्यासह 8 जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना परस्पर अभ्यासिका व ग्रंथालयाची तोडफोड करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन शिवाजी गदादे पाटील, नगरसेविका प्रिया गदादे पाटील, सुरज लोखंडे यांच्यासह ८ जणांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिया शिवाजी गदादे पाटील, शिवाजी भिवा गदादे पाटील, प्रेमराज गदादे पाटील, कुमार जाधव, सुरज नथुराम लोखंडे व इतर ७ ते ८ जण अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. शिवाजी गदादे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते असून त्यांची कन्या प्रिया गदादे पाटील या नगरसेविका आहेत. याबाबत गांधीनगर येथील एका ४५ वर्षाच्या कार्यकर्त्यांने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शिवाजी गदादे यांच्या कार्यालयाजवळ आणि पर्वती पायथा येथे १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून पर्वती पायथा येथील विघ्नहर्ता बिल्डिंगच्या मागे २०२४ पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मोफत अभ्यासिका व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मोफत ग्रंथालय सुरु करण्यात आले. या ग्रंथालयात महापुरुषांची पुस्तके, प्रतिमा अनेकांनी भेटरुपाने दिली आहेत. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अभ्यासिकेचा वीजपुरवठा खंडीत झाला. काही गुंडांनी येऊन तेथील ग्रंथालयाची व अभ्यासिकेची तोडफोड सुरु केली. अभ्यासिकेची मागील भिंत पाडून टाकली. तेथील साहित्य, पुस्तके अशी ७ लाख रुपयांचे सामान चोरुन नेले. तेथील कमान काढून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बॅनर लावला. त्यावर सुरज लोखंडे, प्रिया गदादे पाटील, शिवाजी गदादे पाटी, प्रेमराज गदादे पाटील यांचा बहुउद्देशीय कायमस्वरुपी हॉल असा फ्लेक्स लावला होता. त्यावरुन फिर्यादी यांना समजले की या चार जणांच्या आदेशावरुन हे काम होत आहे. त्यानंतर फिर्यादी हे शिवाजी गदादे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर गेले. त्यावेळी गदादे पाटील यांनी त्यांना कॅनॉलच्या बाजुला नेले.
फिर्यादी यांनी अभ्यासिका का तोडली. महापुरुंषांच्या प्रतिमा काढून फोडून का टाकल्या, असे विचारले. त्यावर शिवाजी गदादे पाटील हे भडकले. जातीवाचक शिवीगाळ करुन ते म्हणाले, ‘‘तुमची लायकी आहे का, इथे काम करायचे असेल तर माझ्या हाताखाली मी म्हणेल तसे करावे लागेल, तरच टिकून राहशील. तुम्हाला अभ्यासिकेची गरज काय आहे. मला माझ्या मुलाला, मुलगीला आणि सुरजला ऑफिस बांधायचे आहे. मी माझ्या प्रभागात काही करु देणार नाही़ म्हणून मी अभ्यासिका उद्धवस्त केली आहे. तुला काय करायचे ते कर. तुझ्यावर खोटे गुन्हे टाकून आयुष्यभर जेलमध्ये सडवेल’’असे म्हणून सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करुन अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर ते तेथून घाबरुन निघून गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी होऊन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार तपास करीत आहेत.
