Pune Crime News | गुन्हा दाखल झाल्यावर शिवाजी गदादे यांचा 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | ग्रंथालयाची तोडफोड करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते शिवाजी गदादे पाटील यांनी आपल्या १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिवाजी भिवा गदादे पाटील (रा. पेशवा बिल्डिंग, सिंहगड रोड) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकुंद अनिल गायकवाड Mukund Anil Gaikwad (वय ४५, रा. राजीव गांधीनगर, पर्वती पायथा, सिंहगड रोड) व शंकर भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळ त्यांच्या पक्ष कार्यालयात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा येथील विघ्नहर्ता बिल्डिंगच्या मागील बाजूस ग्रंथालय व अभ्यासिका होती. याची तोडफोड करुन तेथील साहित्य व पुस्तके असा ७ लाख रुपयांचा माल चोरुन नेला. याबाबत विचारणा करण्यासाठी दोघे जण गेले असताना त्यांना शिवाजी गदादे पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन शुक्रवारी १६ ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा नगरसेवक सुरज लोखंडे, नगरसेविका प्रिया गदादे, शिवाजी गदादे पाटील यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी गदादे पाटील यांच्या तक्रारीनुसार शनिवारी १७ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी गदादे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ते पक्ष कार्यालयात असताना मुकुंद गायकवाड व शंकर भालेराव हे पक्ष कार्यालयाच्या बाहेर आले. त्यांनी फिर्यादी यांना पर्वती पायथा येथील जागेत बहुउद्देशीय हॉल/समाज मंदिर बांधायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करीत आहेत.
