Pune Graduate and Teachers’ Constituencies | पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ : ‘मविआ’चे उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांना संधी द्या; जयंत पाटील यांचे आवाहन
विटा : Pune Graduate and Teachers’ Constituencies | देशातील तरुणाई सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मात्र, ही आंदोलने पोलीस आणि लष्कराच्या बळावर मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात हुकूमशाही फार काळ टिकू शकत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कारभाराविरोधात देशभरात नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विटा येथील श्रेयस भवनमध्ये खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांतील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.
‘लोकशाहीत हुकूमशाही फार काळ चालणार नाही’
जयंत पाटील म्हणाले, “जेन-झी पिढीतील तरुण विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. एकमेकांची ओळख नसलेले अनेक तरुण स्वखर्चाने एकत्र येऊन सरकारच्या विरोधात लढा देत आहेत. ही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न होत असला, तरी लोकशाहीत अशा प्रकारची हुकूमशाही फार काळ चालणार नाही.”
भारतीय जनता पक्षाच्या कारभाराबद्दल देशभरात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या कार्याचा उल्लेख
पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांशी हर्षदा देशमुख-जाधव यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणारा उमेदवार महाविकास आघाडीने दिला असल्याचे ते म्हणाले.
तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले जयंत आसगावकर हे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार असून, त्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
‘दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत’
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचे प्रमाण वाढविण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा. दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात जयदीप यादव, विवेक कोकरे, चंद्रकांत चव्हाण, किरण लाड आणि देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप मुळीक यांनी प्रास्ताविक केले, तर सुवर्णा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
