Tukaram Mundhe | जिम आणि इन्फ्लुएन्सर्सना तुकाराम मुंढेंचा कडक इशारा! दिशाभूल करणाऱ्या सप्लिमेंट्सच्या जाहिरातींवर 10 लाखांपर्यंत दंड; 1.38 कोटींचा साठा जप्त

Tukaram Mundhe | A strict warning from Tukaram Mundhe to gyms and influencers! Fines up to 1 million for misleading supplement ads; stocks worth 13.8 million seized

मुंबई : Tukaram Mundhe |  महाराष्ट्रात प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्सच्या अवैध विक्रीसह दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पावले उचलली आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, जिम व्यावसायिक, फिटनेस ट्रेनर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कडक इशारा देण्यात आला आहे.

सप्लिमेंट्स विक्रीसाठी परवाना आवश्यक

FDA ने २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार, जिम, फिटनेस सेंटर, मेडिकल स्टोअर्स, औषध विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री करण्यासाठी लागू नियमानुसार FSSAI चा अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी आवश्यक आहे.

चुकीच्या जाहिराती केल्यास १० लाखांपर्यंत दंड

सोशल मीडियावर प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादने आणि इतर सप्लिमेंट्सबाबत अतिशयोक्तीपूर्ण किंवा दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवरही कारवाई होऊ शकते. अशा जाहिरातींसाठी १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

१७ आस्थापनांची तपासणी; १.३८ कोटींचा साठा जप्त

FDA ने १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सहा विभागांमध्ये १७ आस्थापनांची तपासणी केली. या मोहिमेत सुमारे १ कोटी ३८ लाख रुपये किमतीचा हेल्थ सप्लिमेंट्सचा साठा जप्त करण्यात आला.

तपासणीदरम्यान काही उत्पादनांमध्ये FSSAI कडून मंजुरी न मिळालेल्या घटकांचा वापर आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

स्टेरॉइड्स आणि औषधी घटकांवरही विशेष नजर

स्पोर्ट्स न्यूट्रिशन, वजन कमी करणारी उत्पादने आणि हर्बल सप्लिमेंट्समध्ये अघोषित स्टेरॉइड्स किंवा औषधी घटकांचा वापर होत असल्याच्या संशयावरून तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारे चुकीचे दावे, विनापरवाना विक्री आणि नियमबाह्य उत्पादने याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

You may have missed