Pune Crime News | स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याने दिल्लीतील स्पर्धा परिक्षांसाठी शासकीय योजनांमधून विद्यार्थ्यांची शिकवणी घेणार्या क्लासविषयी तक्रारी करुन मागितली १० लाखांची खंडणी
पुणे : Pune Crime News | सारथी, बार्टी, महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांची शिकवणी घेणार्या दिल्लीतील क्लासविषयी तक्रारी करुन १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी मागणार्याने आपण पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्याचे खंडणी मागताना सांगितले़.
याबाबत क्षितीज दिलीप बर्वे (वय ३४, रा. भूगाव) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माऊली डुचाळ (Mauli Duchal) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, फिर्यादी क्षितीज बर्वे हे श्रीराम्स आय ए एस क्लासेस या संस्थेतील पुण्यातील शाखाप्रमुख आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून पुणे, हैदराबाद येथे शाखा आहेत. क्लासेसचे प्रमुख श्रीरंगम आहेत. आशुतोष सिंग हे सह संपर्कप्रमुख आहेत. क्लासेस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सारथी, बार्टी, महाज्योती व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या शासकीय संस्थांशी संलग्न असून त्यांच्याकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीराम्स क्लासेसकडून शिकवणी दिली जाते.
क्लासेसचे सह संपर्कप्रमुख आशुतोष सिंग यांच्या मोबाईलवर १ ते २६ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान माऊली डुचाळ याने व्हॉटसअप मेसेज केले. त्याने श्रीराम्स क्लासेसची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली असल्याचे नमूद केले. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाठविलेल्या तक्रारीचे फोटो पाठविले. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आशुतोष सिंग यांना व्हॉटसअप कॉलद्वारे आशुतोष सिंग यांना संपर्क करुन त्याने तो पुणे येथून बोलत असून तो स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या तक्रारी मागे घ्यायच्या असतील तर क्लासेसकडून त्याला १० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास क्लासेस विरुद्ध दिलेल्या तक्रारी मागे घेणार नाही. तसेच यापुढे देखील खोट्या तक्रारी देऊन क्लासेसला त्रास देणार. ते थांबवायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देऊन खंडणी मागितली. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करीत आहेत.
