Sandeep Khardekar | पुण्यात अतिक्रमणांवरील कारवाईनंतरही अनधिकृत व्यवसाय सुरूच; संबंधितांवर MRTP कायद्यानुसार गुन्हे दाखल करा; संदीप खर्डेकर यांची आयुक्तांकडे मागणी

Sandeep Khardekar

पुणे : Sandeep Khardekar | पुणे महापालिकेकडून शहरातील फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमधील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करतानाच, केवळ शेड पाडून प्रश्न सुटणार नाही. कारवाई केलेल्या जागांवर अनधिकृत व्यवसाय सुरूच असल्याने संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act), १९६६ मधील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

यासंदर्भात खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे. शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्तांनी घेतलेल्या ठाम भूमिकेबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेच्या या मोहिमेला सुजाण पुणेकरांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शेड पाडल्या, मात्र व्यवसाय सुरूच!

महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये उभारण्यात आलेल्या शेडवर कारवाई केली आहे. मात्र, या शेड हटवल्यानंतरही संबंधित जागांमध्ये व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा खर्डेकर यांनी केला आहे.

केवळ शेड हटवून अतिक्रमणविरोधी कारवाईचा उद्देश साध्य होणार नाही. प्रशासनाची मोहीम कालांतराने शिथिल झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा शेड उभारल्या जाण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

१६ मार्चच्या निवेदनाची आठवण

संदीप खर्डेकर यांनी १६ मार्च २०२६ रोजी महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अतिक्रमणविरोधी कारवाईबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यावेळी उपस्थित केलेल्या समस्या आजही कायम असल्याचा दावा त्यांनी नव्या निवेदनात केला आहे.

अनधिकृत व्यवसायांवर कायमस्वरूपी कारवाईची गरज

महापालिका प्रशासन अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात खरोखर गंभीर असेल, तर केवळ तात्पुरती कारवाई न करता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलणे आवश्यक असल्याचे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांविरोधात MRTP कायदा, १९६६ मधील लागू तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

अतिक्रमणांवरील कारवाई प्रभावी आणि कायमस्वरूपी ठरावी, यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका संदीप खर्डेकर यांनी मांडली आहे.

You may have missed